शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दोघांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. हडको भागातील ४ वर्षांचा स्वराज कुंटे व सिडको परिसरातील नवजीवन कॉलनीमधील अश्विनी बोलकर (वय २१) या युवतीचा डेंग्यूने मृत्यू झाला. अश्विनी हिने राज्यस्तरीय धावपटू म्हणून चमकदार कामगिरी केली होती.
शहरातील विविध खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या शहरासाठी महापालिकेकडे केवळ १० धूरफवारणी यंत्रे व १० लाखांची तरतूद आहे. डेंग्यूसाठी केल्या जाणाऱ्या रक्त चाचण्यांपकी ५० टक्क्यांहून अधिक चाचण्या सकारात्मक असल्याचे अहवाल आल्याने आरोग्य यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका मात्र अजूनही ढिम्म आहे. धूरफवारणीस पुरेशी तरतूद नाही व या कामासाठी दिले जाणारे कंत्राटही कमी किमतीचे आहे. सहा प्रभागांमधील वेगवेगळ्या कंत्राटदारांना प्रत्येकी २ लाख ९ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांच्याकडे ८ मजूर व निरीक्षक असल्याची कागदोपत्री नोंद आहे. वार्षिक २ लाख ९ हजारांच्या कंत्राटात धूरफवारणी यंत्र, औषधेही कंत्राटदारालाही खरेदी करावी लागतात. त्यामुळे धूरफवारणी करणाऱ्यांच्या वाटय़ाला फारशी रक्कम येत नाही. त्यामुळे तेही फिरकत नाही. येत्या काही दिवसांत धूरफवारणीच्या आणखी २५ मशीन मिळतील. त्यानंतर हे काम सोपे होईल, असे अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, खासगी रुग्णालयात थंडी ताप व डेंग्युसदृश्य रुग्णांची संख्या वाढतच आहे.
डेंग्यूची साथ पसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर हिवताप निर्मूलन व्यवस्थेतील १५० कर्मचाऱ्यांची बठक घेतल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टाकळीकर यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या स्वराज कुंटे याच्या घराच्या परिसरात पाहणी केली असता डासांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. पुरेशा प्रमाणात अॅबेट व इतर औषधे असल्याचा दावा महापालिकेचे अधिकारी करीत आहेत.
महापालिकेकडे धूरफवारणीसाठी मशीन असणाऱ्या दोन गाडय़ा आहेत. मात्र, त्यातील एक मशीन नादुरुस्त आहे. त्यामुळे त्यावरील कर्मचारी बसून आहेत. अॅबेट व गटारीमध्ये ऑईलसारखे द्रव टाकण्याचे काम ‘ब’ वॉर्डात पूर्ण झाले असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. विशेषत: बजाजनगर, वाळुज भागात डेंग्यूचा फैलाव अधिक आहे. शहरातही तो वाढता असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नुसतेच काळे ढग दाटून येतात. त्यामुळे ऊन पडत नाही. डासांची संख्याही वाढली आहे. महापालिकेतील अधिकारी डासांची घनताही तपासतात. त्यांच्या मते हे प्रमाण तसे अधिक नाही. मात्र, काही भागात ते जास्त आहे. महापालिकेकडून या विभागाला केवळ १० लाखांची तरतूद ठेवली जाते. ती दुरुस्तीसाठी पुरत नाही. औषधांचा साठा हिवताप निर्मूलन विभागाकडून होत असल्याने तशी तरतूद कमी लागते, असे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांत महापालिका क्षेत्रात केवळ ११० रुग्ण संशयीत असल्याची सरकारी आकडेवारी आहे.

Story img Loader