हैदराबादहून मुंबईकडे जाणारी एस.टी. बस व मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार, तर अन्य ३२जण जखमी झाले. उमरगा तालुक्यातील येणेगूर टोलनाक्यानजीक गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
हैदराबादहून मुंबईकडे जात असलेली बस (एमएच ४० एन ९१९७) उमरगा येथे संध्याकाळी पावणेपाचला आली होती. तेथून मुंबईला रवाना झालेली बस येणेगूर टोलनाका ओलांडून आष्टामोड येथे आली असता, मुंबईहून हैदराबादकडे निघालेली मालमोटार (एमएच २५ बी ९८११) चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला समोरून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. बसचालक प्रकाश घाडगे (खानापूर, जिल्हा सोलापूर), वाहक रवींद्र अप्पाराव चेंडके (सोलापूर), प्रवासी सचिन अप्पाराव कलखेरी (संगळगी, तालुका आळंद), रामचंद्र धोंडिबा हाके, सुबोध अशोक वाघमारे (सोलापूर), नागरबाई अंबादास कदम (सास्तूर, तालुका लोहारा), विद्युलता दत्तात्रय महामुनी (तुगाव, उमरगा), विक्रम नागनाथ वाघे (निलवाड), लियाकत शेख (नळदुर्ग), मदिना रशीद शेख (पुणे), शारदा लोहार (नळदुर्ग), संगीता राजपालसिंग बायस (पाथरी), सुरेखा शहाजी राठोड (खेड, अहमदनगर), राशदबी दस्तगीर शेख (पुणे), मिठालाल पृथ्वीराज जैन (सुरत, गुजरात), शंकर तात्याराव डोंगरे (किणी), गुंडूसाब लाकडेसाब कारचे (उमरगा), हरिश्चंद्र भोसले, भागीरथी भोसले (उस्मानाबाद), महादेव सिद्दय्या स्वामी, ज्योती महादेव स्वामी, प्रमिला सिद्दय्या स्वामी, अनिता सुधाकर स्वामी (बोरामणी, सोलापूर) अन्य पाच असे एकूण ३२जण जखमी झाले.
अपघातातील गंभीर जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना नळदुर्ग, उमरगा येथील नरेंद्रस्वामी रुग्णसेवा मंडळाच्या रुग्णवाहिकांमधून नळदुर्ग, उमरगा व जळकोट येथील शासकीय रुग्णालयांत हलविण्यात आले.
एस.टी. बस-मालमोटारीची धडक; २ ठार, ३२ जखमी
हैदराबादहून मुंबईकडे जाणारी एस.टी. बस व मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार, तर अन्य ३२जण जखमी झाले.
First published on: 11-04-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in st bus accident