सोलापूर : आकर्षक परताव्याचे आमीष दाखवून ठेवीदारांना गंडा घालण्याचे दोन प्रकार सोलापुरात उजेडात आले आहेत. यात नाशिक येथील कंपनीने ९३ ठेवीदारांची ९४ लाखांची फसवणूक केली. तर पंढरपूरच्या पतसंस्थेने ठेवीदारांना तीन कोटी ९३ लाख ७२ हजार रूपयांस चुना लावला आहे. यासंदर्भात सोलापूर शहरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या फिर्यादीनुसार नाशिक येथील मनी सिर्केट मल्टिट्रेड प्रा. लि. कंपनीच्या तीन संचालकांविरूध्द महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे संचालक सचिन सुधाकर वरखडे, अमोल नरेंद्र खोंड आणि अरविंद मेहता (तिघे रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> सातारा: खंबाटकी बोगद्यात मोटारीवर लोखंडी खांब आज पुन्हा पडला
यासंदर्भात स्वाती लालूप्रसाद मुत्याल (वय २४, रा. आडम प्लाॕटस्, नीलमनगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ फेब्रुवारी २०१९ ते २९ आॕगस्ट २०१९ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला. एका खासगी रूग्णालयात नोकरीस असलेल्या स्वाती मुत्याल यांचे पती लालूप्रसाद मुत्याल हे मुंबईत एका कंपनीत नोकरीस आहेत. हे दोघे पती-पत्नी आपल्या ओळखीच्या पुष्पा विभूते यांच्या घरी कामानिमित्त गेले असता तेथे त्यांची गणेश चौखंडे आणि गणेश भोसले यांच्याशी ओळख झाली. हे दोघेही नाशिकच्या मनी सिर्केट मल्टिट्रेड प्रा. लि. कंपनीचे एजंट होते. या भेटीत त्यांनी मुत्याल दाम्पत्याला कंपनीबाबात माहिती दिली. कंपनीच्या ठेव योजनांची माहितीही दिली.
हेही वाचा >>> “मी नाराज नाही, पण आमची नाराजी दूर करणारा…”, ‘त्या’ प्रश्नावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
कंपनीत पाच हजार रूपये गुंतविल्यास ठेवीदाराला प्रथाम ओळखपत्र मिळते. नंतर अडीच हजार हजार, पाच हजार, दहा हजारांपासून ते दोन लाख रूपयांच्या पटीपर्यंत गुंतवणूक केल्यास ४५ दिवसांत आकर्षक परतावा मिळेल. आकर्षक भेटवस्तूही मिळतील. अशा प्रकारे दाखविण्यात आलेल्या आमिषाला बळी पडून मुत्याल दाम्पत्याने कंपनीत चार लाख १० हजारांची रक्कम गुंतवली. त्यानंतर त्यांना ९० हजार १०० रूपयांचा परतावा मिळाला. तेव्हा कंपनीच्या योजनेकडे आकर्षित होऊन अन्य ९२ ठेवीदारांनीही ठेवी गुंतवल्या. परंतु नंतर कंपनीने कोणताही परतावा दिला नाही. कंपनीच्या संचालकांनी कट रचून नियोजनबध्दरीत्या ठेवीदारांना ९३ लाख ९४ हजार ७४ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे दिसून आले. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पंढरपुरात संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेतही ठेवीदारांना आर्थिक गंडा घालण्याचा प्रकार उजेडात आला असून याप्रकरणी पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक-अध्यक्ष प्रथमेश सुरेश कट्टे (वय ३०) आणि सचिव अविनाश ठोंबरे (वय ४५, रा. पंढरपूर) यांच्या विरूध्द सहकार विभागाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. फसवणुकीची रक्कम तीन कोटी ९३ लाख ७७ हजार रूपये एवढी आहे. पतसंस्थेने स्वतःचे बँकखाते खोटे आणि बनावट काढल्याचेही दिसून आले.