लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या जीबीएस रुग्णांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, ते दोघेही जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली. रुग्णालयात दाखल झालेल्यापैकी १२ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही त्यांनी सांगितले.

मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील एक पंधरा वर्षांचा जीबीएसबाधित रुग्ण दाखल झाला होता. उपचार सुरू असतानाच त्याचा १२ फेब्रुवारीस मृत्यू झाला, तर सांगोला (जि. सोलापूर) येथील ६० वर्षांची महिला रुग्ण उपचारासाठी दाखल झाली असताना तिचा शुक्रवारी पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णालयात १२ जीबीएस रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, यामध्ये सहा महिला, सहा पुरुष असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेस सहव्याधी असल्याचे समजले.

दरम्यान, काही खासगी रुग्णालयांत सात जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. हा आजार जितक्या लवकर उपचार सुरू केले जातील तितक्या लवकर आटोक्यात येत असून रुग्णांनी पायात मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवत असेल तर तातडीने उपचार घेतले, तर निश्चितपणे या आजारातून मुक्तता होऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांनी पिण्यासाठी दुषित पाण्याचा वापर करू नका. पाणी उकळून, गाळून आणि थंड करून प्यावे. तसेच वरील लक्षणे दिसू लागताच तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात जीबीएस रुग्णसंख्या १४ वर दिसत असली तरी यापैकी काही रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील आहेत. यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे. शासकीय रुग्णालय सतर्क असून रुग्णासाठी आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.