अवघ्या काही दिवसांपूर्वीच रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेल्या दंगलसदृश्य स्थितीमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटताना पाहायला मिळाले. आता अहमदनगरमध्ये मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली आहे. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले.
नेमकं काय घडलं?
अहमदनगरच्या गजराजनगर परिसरात हा सगळा प्रकार घडला. इथल्या वारुळवाडी रस्त्यावर दोन गटांमध्ये काही कारणावरून बाचाबाची सुरू झाली. लवकरच या वादाचं रुपांतर तुफान दगडफेकीमध्ये झालं. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा सगळा राडा सुरू झाला. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी परिसरात उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल जालून टाकल्या तसेच, बाजूला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
जखमी रुग्णालयात दाखल
या गोंधळाची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या वादामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गजराजनगर, मुकुंदनगर आणि वारुळवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला. रात्री उशीरा नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम चालू होतं.
दरम्यान, आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.