औरंगाबाद शहराजवळील वाळूज व नारेगाव परिसरात बुधवारी अनुक्रमे वाहनांचे इंडिकेटर निर्मिती करणाऱ्या व टायर रिमोल्ड करणाऱ्या कारखान्यांना आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही घटनांबाबत रेल्वे स्टेशन मार्गावरील व चिकलठाणा अग्निशमन विभागाकडून दुजोरा मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाळूजमधील वाहनांचे इंडिकेटर तयार करणाऱ्या केटीएल ऑटोमोटीव्ह प्रा.लि. या कंपनीला आग लागून कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. नीरज गोएल यांच्या मालकीची ही कंपनी एमआयडीसी वाळूज परिसरातील एल सेक्टरमध्ये आहे. कंपनीला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू न शकल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती कंपनीतील इतर सहकाऱ्यांना आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर पाण्याचा आणि फोमचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

पेंटशॉपमध्ये असलेले केमीकलयुक्त रंगामुळे आणि प्लास्टीकमुळे आग अधिकच भडकत असल्याने बजाज ऑटो कंपनीचा अग्निशमन बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. जवळपास तीन तास आगीचे तांडव सुरू होते. एलएपीएल ऑटोमोटीव्ह या कंपनीला लागलेली आग तीन तासानंतर नियंत्रणात आली. परंतु तोपर्यंत लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सतीश धारपुरकर यांनी दिली.

नारेगावात टायरच्या गोदामाला आग –

सावंगी बायपास रोडवरील नारेगाव येथे असलेल्या कचरा डेपो समोरील टायरच्या गोदामाला बुधवारी (दि.२) दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. टायरच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल नागरे, विनायक कदम आदींनी दिली. अग्निशमन दलाचे जवान भगवान शिंदे, नदीम शेख, वाहनचालक मिनिनाथ झाडे आदींनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवली. या घटनेत लाखो रूपये किमतीचे टायर जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two incidents of fire in waluj and naregaon in aurangabad loss of millions of rupees msr