चळवळीशी फारसा संबंध नसतानाही केवळ सामानाचे ओझे वाहून नेण्यासाठी नक्षलवाद्यांनी सोबत नेल्यामुळे दोन तरुणींना भटपरच्या चकमकीत जीव गमवावा लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापैकी एका तरुणीची ओळख पटवण्यावरून संभ्रम निर्माण झाल्याने पोलिसांनी आता डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांच्या बाबतीत अशी चाचणी प्रथमच होत आहे.
शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात भामरागड तालुक्यातील भटपर गावाजवळ गेल्या ४ एप्रिलला पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. यात दोन तरुणींचासुद्धा समावेश होता. हे पाचही नक्षलवादी या भागात सक्रिय असलेल्या कंपनी क्रमांक दहाचे सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी प्रत्यक्षात या चकमकीत मारल्या गेलेल्या दोन आदिवासी तरुणींचा चळवळीशी फारसा संबंध नव्हता, अशी माहिती आता समोर येत आहे. या चकमकीच्या आदल्या दिवशी नक्षलवाद्यांनी भटपर गावात सभा घेतली होती. या सभेत नक्षलवाद्यांना जेवण व पाणी देण्याचे काम या तरुणी करत होत्या. सुनीता ताडो ही तरुणी कधीच चळवळीसोबत नव्हती. नक्षलवादी गावात आले की त्यांची सोय करण्याचे काम ती नेहमी करायची. सुनीतासोबत मारली गेलेली सराई पुसला ही दुसरी तरुणी भटपरपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेनगुंडा गावात राहणारी होती.
३ एप्रिलला नक्षलवाद्यांनी घेतलेल्या सभेसाठी पेनगुंडाचे लोकसुद्धा आले होते. त्यांच्यासोबत ही तरुणीसुद्धा होती. सुनीतासोबत सराईने त्या दिवशी नक्षलवाद्यांची सरबराई केली. रात्री नक्षलवादी जंगलात निघून गेल्यानंतर या तरुणी भटपर गावातच थांबल्या होत्या. सकाळी या तरुणींवर जेवण नेऊन देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सकाळी ८ च्या सुमारास या दोघी नक्षलवाद्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या. नंतरच्या अध्र्या तासात चकमक सुरू झाली आणि त्यात या दोन्ही आदिवासी तरुणींचा मृत्यू झाला. चळवळीत सक्रिय असलेल्या सदस्यांना नक्षलवाद्यांकडून युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे चकमकीच्या वेळी नेमकी कशी कृती करायची याचा सराव सर्वाना असतो. या तरुणींना असे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले नव्हते. त्यामुळे गोळीबार सुरू झाल्यावर भांबावलेल्या या तरुणी सैरावैरा पळू लागल्या आणि त्यातच त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला.
सकाळी नक्षलवाद्यांना जेवण दिल्यानंतर या दोघी गावात परत येण्यासाठी निघाल्यासुद्धा होत्या. मात्र, नक्षलवाद्यांनी जवळच असलेली नदी पार करेपर्यंत सामानाचे ओझे घेऊन सोबत चला, असा आदेश दिल्याने या दोघींचा नाइलाज झाला, अशी धक्कादायक माहिती आता गावकऱ्यांकडून समोर येत आहे. या दोघी चळवळीत सक्रिय नव्हत्या, चकमकीच्या वेळी नक्षलवाद्यांसोबत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या वृत्ताला आता वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा दुजोरा देऊ लागले आहेत. चकमकीत ठार झालेल्या सुनीता ताडोची ओळख पोलिसांनी सरिता ऊर्फ ज्योती या नावाने पटवली. यासाठी समर्पित नक्षलवाद्यांचा आधार घेण्यात आला. ही सरिता बस्तरची राहणारी आहे, असे सांगून पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतल्यानंतर ६ एप्रिलला मृतदेह त्यांच्या सुपूर्द केला. आता सुनीताच्या भावाने चकमकीत ठार झालेली माझी बहीण होती, असा दावा केल्याने अडचणीत आलेल्या पोलिसांनी आता या दोन्ही कुटुंबाच्या डीएनए चाचणीचा निर्णय जाहीर केला आहे. सुनीताचा भाऊ विनोद ताडोच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले असून मृतदेह घेऊन गेलेल्या बस्तरमधील सरिताच्या कुटुंबाचे नमुने घेण्यासाठी एक पथक छत्तीसगडला रवाना करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या बाबतीत डीएनए चाचणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नक्षलवाद्यांच्या सामानाचे ओझे वाहणे दोन्ही निरपराध तरुणींच्या प्राणावर बेतले
चळवळीशी फारसा संबंध नसतानाही केवळ सामानाचे ओझे वाहून नेण्यासाठी नक्षलवाद्यांनी सोबत नेल्यामुळे दोन तरुणींना भटपरच्या चकमकीत जीव गमवावा लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापैकी एका तरुणीची ओळख पटवण्यावरून संभ्रम निर्माण झाल्याने पोलिसांनी आता डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे.
First published on: 11-04-2013 at 04:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two innocent girls died in encounter