परभणी: रमजान महिन्याचा पवित्र सण सध्या सुरू आहे. या सणाची पूर्वतयारी करत असताना घराच्या साफसफाईचे काम करते वेळेस घरातील लोखंडी कुलरमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का लागून दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील गौर येथे बुधवारी (दि.२६) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गौर येथे बुधवारी (दि.२६) याच गावात राहणारी महिला शेख जहुराबी शेख (वय वर्ष ५२) ही महिला दुपारी बाराच्या सुमाराला रमजान ईदनिमित्त घरातील साफसफाईचे काम करत होती. दुपारी बारा वाजता घरातील साफसफाईचे काम सुरू असताना अचानक तिचा घरातील लोखंडी कुलरला स्पर्श झाला. या कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता त्यामुळे तिला जोराचा विजेचा धक्का बसला. तिने यावेळी मोठ्याने आवाज दिला. आवाज दिल्यानंतर तिच्या बाजूला असलेली तिची सख्खी जाऊ बिस्मिल्लाबी इस्माईल शेख (वय वर्ष ५८) ही महिलाही आवाजाच्या दिशेने धावत आली आणि तिने शेख जहुराबी हिला पत्र्याच्या कुलर पासून लांब ढकलण्याचा प्रयत्न केला.

लोखंडी कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे या दोन्हीही सख्ख्या जावांना विजेचा जोरात धक्का बसल्यामुळे त्या जागेवरच गतप्राण झाल्या. दरम्यान या घटनेची माहिती तात्काळ गावात सगळीकडे पसरली. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन विजेचा प्रवाह बंद केला. त्यानंतर  त्या महिलांना कूलरपासून दूर केले. दरम्यान, गावात घटना घडल्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी चुडावा पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व प्रत्यक्ष घटनेचा पंचनामा केला. पंचनामा करून दोन्हीही मयत महिलांचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.