ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरीच्या जंगलात गावकऱ्यांनी बुधवारी बिबटय़ाचा थरार अनुभवला. आधी एका व्यक्तीच्या नरडीचा घोट घेणाऱ्या या बिबटय़ाने नंतर मृतदेहाचा पंचनामा सुरू असताना अचानक झाडावरून उडी घेत आणखी एका महिलेचा बळी घेतला. एकाच वेळी दोघांचे बळी घेणाऱ्या या बिबटय़ाला पकडण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी आता युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. ताडोबा प्रकल्पातील अडेगाव येथील रहिवासी असलेले तुकाराम धारणे (६५) हे बुधवारी सकाळी पत्नीला आगरझरी येथे सासरी सोडून गावाकडे परत येत होते. जंगलातील वाटेत पडलेली मोहफुले ते वेचत असतानाच त्या ठिकाणी एका झुडपामागे दडून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला.

Story img Loader