सांगली : आष्ट्याजवळ दुचाकी आणि मोटार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गुरुवारी सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला. कराडजवळील नाईकबा यात्रेसाठी दुचाकीने जात असताना हा अपघात गाताडवाडी फाट्याजवळ घडला. याबाबत मिळालेली माहिती अशी, धनाजी यादव (वय ६२) व अनिल सरडे (वय ४७ रा. आष्टा) हे दोघे दुचाकीवरून (एमएव १० बीटी १६९५) इस्लामपूरकडे निघाले होते. सायंकाळी साडेचार वाजता गाताडवाडी फाटा येथे आल्यानंतर समोरून अन्य वाहनाला ओलांडून पुढे येत असताना मोटारीने (एमएच १२ यूएस ०३१८) या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात यादव हे जागीच ठार झाले तर सरडे यांना अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात उपचारास नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी व मोटारीचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात मोटारचालक आवाणा बामणे (रा. आंबेगाव, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू उपशाविरूध्द कारवाई

आटपाडीच्या महसूल विभागाने वाळुच्या अवैध उपशाविरूध्द धडक मोहिम राबवत ४० ब्रास वाळू जप्त केली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशाने तहसिलदार सागर ढवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या मोहिमेत तलाठी विनायक बालटे, विनायक पाटील, अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जाविर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकाने वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत ही वाळू जप्त केली. ज्या वाहनांद्वारे ही वाळू वाहतूक व डेपो करण्यात आला आहे, त्या वाहनचालकांची व मालकांची स्थानिक चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महसूल विभागाने अवैध वाळू तस्करी करणार्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे तसेच जप्त वाळू प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू देण्यात येणार आहे.