शहराच्या मध्यवस्तीतील भाजीमंडईत आज सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेनऊच्या सुमारास एका गुन्हेगाराने एका व्यापाऱ्यावर केलेल्या गोळीबारात या व्यापाऱ्याचा जागीच मूत्यू झाला, तर नंतर संतप्त जमावाने या गुन्हेगारावर केलेल्या हल्ल्यात या गुन्हेगाराचाही जागीच मृत्यू झाला. उमेश उर्फ बबलू भीमराव माने (३८, रा.भाजी मंडई, कराड) असे या धान्य व्यापाऱ्याचे नाव आहे. तर बाबर शमशाद खान (४५, रा. बैलबाजार रोड, कराड) असे मृत गुन्हेगाराचे नाव आहे. दरम्यान भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या भीषण हत्याकांडाने शहरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. घटनेनंतर बाजारपेठ बंद राहिली, तर काही शाळा मधूनच सोडण्यात आल्या.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बबलू माने हा आज सकाळी आपल्या घर व दुकानानजीकच्या वाचनालयात वृत्तपत्र वाचन करीत असताना बाबर खानने त्याच्यावर गोळीबार केला. या वेळी बबलू मानेची आई अनुसया भीमराव माने (६०) यांनी बाबर खानला प्रतिकार केला. यानंतर संतप्त जमावाने त्यास मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्यात अवजड वस्तूचा प्रहार झाल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. दरम्यान, बबलू माने यास तत्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. पण, त्याचे निधन झाले होते. अनुसया माने यांच्या गुडघ्यालाही गोळी लागली आहे. तर, बबलू माने याच्या दंडाला गोळय़ा लागताना एक गोळी छातीत घुसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बाबर खान याचे शवविच्छेदन झाले आहे. तर, बबलू माने याचे शवविच्छेदन झाल्यानंतरच त्याला किती गोळय़ा व त्या कुठे लागल्या हे स्पष्ट होणार आहे. घटना घडताच काही क्षणात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून सदरचा रस्ता वाहतुकीस मोकळा केला. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ते या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी येथे तळ ठोकून असून, मोठा पोलीस बंदोबस्त शहर परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील पिस्तूल, काडतुसे, दगड व सिमेंटची पाईप जप्त केली आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचा कयास बांधण्यात आला असून, पोलिसात खान व माने यांचे या दोघांविरोधातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. बाबर खान याच्याविरूद ६ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या याचा सहकारी असल्याचे समजते. तर, बबलू माने विरूध्द १० गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरील पिस्तुल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा (फॉरेन्सिक  लॅब) तज्ञांकडे तपासण्यासाठी पाठवली जाणार आहे. बबलू माने याच्यावरील गोळीबारप्रकरणी त्याची आई अनुसया माने यांनी फिर्याद दिली आहे. तर, बाबर खान याच्या नासिर खान या भावानेही फिर्याद दिली आहे. खान याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सध्या अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी शहर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असून, नजीकच्या पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच जलदकृतीदलाच्या दोन तुकडय़ा, राज्य राखीव दलाची एक कंपनी (३ प्लाटून) यासह दंगाविरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतीमान झाली आहेत. जनजीवन सुरळीत होताना, तणावाचे वातावरणही लवकरच निवळेल असा विश्वास डॉ. देशमुख यांनी दिला आहे.

Story img Loader