सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नरवणे या गावात वाळू उपशाच्या कारणातून वाळू तस्करांच्या दोन गटात झालेल्या तुंबळ मारामारीत दोघांचा मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत नाथा जाधव व विलास धोंडीबा जाधव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
हत्येची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण व शांतता आहे. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले असून, काहींनी तर भीतीने घराचे दरवाजे देखील बंद करुन घेतले आहेत.
आज (बुधवार) सकाळी नरवणे (ता.माण) येथे वाळू उपशाच्या कारणातून वाळू तस्करांच्या दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली. यामध्ये तलवारीने जबरी वार झाल्याने जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही गटातील एका व्यक्तीचा मारामारीत मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी आहेत.
चंद्रकांत जाधव यांनी सरकारी वाळूचा लिलाव घेतला होता. या वाळूच्या साठ्यावर काही जण बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याची तक्रार गावकामगार तलाठी यांच्याकडे करण्यात आली होती.यावरून वाळू उपसा करणाऱ्या दोन गटात आज सकाळच्या सुमारास तुफान मारामारी झाली. या मारामारीत हत्यारांचा वापर झाल्याने, दोघांना जीव गमवावा लागला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी भेट दिली आहे.
लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल –
वाळू उपशाच्या कारणातून भांडणातून झालेल्या मारामारीत दोन गटातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.