दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी (ब्रीज) येथे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत असताना अचानकपणे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तुकाराम महादेव शिंदे (३५) व मारुती राम मादर ( ३५, दोघे रा. चडचण, जि. विजापूर) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर सिद्धू पीरपा बाबानगरे (३६, रा. मसळी, जि. विजापूर) व सिद्धाराम ईरप्पा कोळी (३८, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. टाकळी गावात आठवडा बाजारात गर्दी झाली होती. परंतु सायंकाळी अचानकपणे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. काही भागात गारपीटही झाली. त्यामुळे बाजारात धावपळ होत असताना काहींनी आश्रयासाठी एका पत्रा शेडमध्ये शिरकाव केला. परंतु दुर्दैवाने या पत्रा शेडवर वीज कोसळली आणि त्यात आश्रय घेतलेल्या चौघांवर आफत कोसळली. मंद्रूप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून दक्षिण सोलापूरचे तहसीलदार बाबूराव पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Story img Loader