तालुक्यातील राशिन येथील साळवे कॉलनीत शनिवारी दुपारी चार वाजता बोअरवेलच्या गाडीखाली बसून जेवण करीत असताना लागेश व चंदुरा (पूर्ण नाव समजले नाही. दोघेही राहणार छत्तीसगड) या मजुरांच्या अंगावर वीज पडून हे दोघे जागीच ठार झाले. दोन बालकामगारही यात जखमी झाले.
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. राशिन परिसरात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग आले व विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. या वेळी साळवे कॉलनीजवळ परप्रांतीयांची बोअरची गाडी उभी होती. या गाडीवरील सर्व कामगार बोअरचे काम आटोपून जेवण करीत होते. या वेळी मोठा आवाज होऊन विजेचा मोठा लोळ गाडीखाली कोसळला. त्याच्या धक्क्याने कडेला बसलेले लागेशा व चंदुरा हे मजूर जागीच टार झाले. त्यांच्या अंगावर कोठेही जखमा नाहीत. त्यांच्या सोबत असलेले चैतू व आणखी एक जण त्या धक्क्याने जखमी झाला आहे. त्यांना बारामती येथे हलवण्यात आले आहे.
तालुक्यात तापमान चांगलेच वाढले असून उन्हाच्या चटक्याला नागरिक वैतागले आहेत. कर्जत शहरासह तालुक्यातील ब-याचशा भागातही शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सायंकाळी गारपीट!
तालुक्यात राक्षसवाडी व या परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार गारपीट झाली. अन्यत्रही ब-याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.