बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोप बांगलादेशी असल्याचा आरोप झाल्यानंतर आता महाराष्ट्रात किती बांगलादेशी घुसखोर आहेत, याची चर्चा सुरू झाली. भाजपा नेते किरीट सोमय्या हे या प्रकरणी पाठपुरावा करत असून ते विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. राज्यात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीमांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. मालेगावपासून याची सुरुवात झाली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. मालेगावमधील दोन राजकीय नेते, दहशतवादी संघटनेचे नेते आणि सीमेवरील दोन एजंट यात सामील आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एटीएसची स्थापना केली आहे. जे बांगलादेशी रोहिंग्या खरी प्रमाणपत्रे सादर करू शकणार नाहीत, त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठविले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल नुकतेच मालेगावचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. मालेगावप्रमाणेच इतर ठिकाणीही आता कारवाई होणार असून काही अधिकाऱ्यांचे निलंबन होणार असल्याचे सुतोवाच सोमय्या यांनी केले आहे. एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई दुसऱ्या बाजूला या बांगलादेशींना परत पाठवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच यापुढे जन्म प्रमाणपत्र देत असताना व्यवस्थित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यानुसार जन्म प्रमाणपत्र वाटल्याची आकडेवारी दिली. ते म्हणाले, यवतमाळला १३,५००, अमरावती आणि अकोलामध्ये १५,००० लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. तर अकोला शहरात साडेचार हजार लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावतीमधील गाव अंजनगाव सुर्जीमध्ये २२ हजार मुस्लिमांची संख्या असून त्यात १,४८० बांगलादेशी मुस्लीम आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना बांगलादेशाच्या सीमेवरील एजंट यांनी मोठे षडयंत्र आखले. लोकसभेत यांचे अधिक खासदार निवडून आल्यानंतर आता त्यांचे सरकार येणार या विचाराने त्या चार-पाच महिन्याच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला होता. यापैकी १ लाख ७ हजारांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh bangladeshi rohingyas applied for birth certificates in maharashtra alleges by bjp leader kirit somaiya rno news kvg