लोकसत्ता वार्ताहर
अहिल्यानगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये आज सात वर्षानंतर येणारा शतचंडी यज्ञ सोहळा पूर्ण आहुती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. हेलिकॉप्टर मधून देवीच्या मंदिरावर व शिखरावर पुष्पवष्टी करण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार या उपस्थित होत्या.
राशीन येथील श्री जगदंबा देवी हे माहूरगडाचे स्थान आहे. पुराणामध्ये या देवीचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. या मंदिरामध्ये अकरा वर्षानंतर येणारा शतचिंडी उत्सव साजरा झाला. देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा याचा लोकार्पण सोहळा तसेच देवीच्या शिखरावर सोन्याचा कळस बसवण्यात आला. याशिवाय सप्तशती पाठ व विविध धार्मिक कार्यक्रम आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करताच दोन लाख भाविकांनी एकाच वेळी आई राजा उदो उदो.. जगदंबा माता की जय.. आईसाहेब.. असा गजर केला. हा आवाज परिसरामध्ये दुमदुमून गेला होता. प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी या सर्व कार्यक्रमांसाठी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासनाला देखील अवघड जात होते.
रणरणत्या उन्हात भाविकांचा प्रचंड उत्साह
ऐन दुपारच्या वेळी प्रचंड ऊन आणि उष्णता असताना देखील अनवाणी पायाने लाखो भाविक रणरणत्या उन्हामध्ये या सोहळ्यामध्ये व दर्शनासाठी तासनतास रांगेमध्ये उभा होते. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन जगदंबा देवी सेवा संस्थान ग्रामस्थ, भाविक व जगदंबा देवी ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. दिवसभरामध्ये एकूण तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. अशी माहिती सेवा संस्थांनचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी दिली.