सांगली : वाळवा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन नर जातीच्या बिबट्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी एका बिबट्याचा मृत्यू विहीरीत बुडून झाला असून दुसर्‍या बिबट्याच्या मृत्यचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार्वे (ता. वाळवा) येथील हणमंत माळी यांच्या शेतातील विहीरीत एका सहा महिने वयाच्या बिबट्याचा मृतदेह आढळला. मृत बिबट्याला इस्लामपूरातील दत्त टेकडी परिसरात असलेल्या कार्यालयात आणून डॉ. अंबादास माडकर यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले. या बिबट्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे डॉ. माडकर यांनी तपासणीनंतर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, महामार्गालगत असलेल्या इटकरे गावच्या शिवारात रविंद्र पाटील यांच्या शेतातील उसाच्या फडात कुजलेल्या स्थितीत बिबट्याचे पार्थिव आढळून आले. उस तोडीसाठी रानात गेल्यानंतर दुर्गंधी येत असल्याने त्यांनी फडाची पाहणी केली असता मृत बिबट्या फडात पडल्याचे दिसून आले. याची माहिती वन विभागाला तात्काळ देण्यात आली.

हेही वाचा: “…याचा अर्थ याला ठाकरेंची मूक सहमती आहे”, आमदार नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्र!

वन विभागाचे उपवन संरक्षक नीता कट्टे, सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, मानद वन्य जीव रक्षक अजित पाटील यांच्यासह वन कर्मचारी यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. इटकरे येथे पशूवैद्यकीय तज्ञ डॉ. माडकर यांनी जागेवरच जाउन बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्याच ठिकाणी त्यांचे दहन करण्यात आले. महामार्गावर वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असला तरी मृत्यूमागील निश्‍चित कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two leopards died in a farm in valwa taluka in sangli news tmb 01
Show comments