केंद्र सरकारकडून कोकणात दोन मोठे उद्योग आणले जाणार असून, यातून जवळपास १० हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली आहे.
ते अलिबाग येथे पत्रकारांशी बोलत होते. अवजड उद्योग मंत्रालयाकडून रत्नागिरी जिल्ह्य़ातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी आणि रायगड जिल्ह्य़ातील चणेरा एमआयडीसी परीसरात हे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बठकीत मान्यता दिली जाईल.
रत्नागिरीतील लोटे येथील औद्योगिक वसाहतीत िहदुस्थान पेपर कार्पोरेशनचा कागद निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पाबरोबर या परिसरात टाऊनशिपही विकसित केली जाणार आहे. २४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी लागणारी जागा एमआयडीसीकडे सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नव्याने भुसंपादन करावे लागणार नाही. कागद निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही याठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकणार असल्याचे गीते यांनी सांगीतले.
रायगड जिल्ह्य़ातील महाड एमआयडीसीत एक प्रकल्प आणण्याचा अवजड उद्योग मंत्रालयाचा प्रयत्न होता. मात्र या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने आता रोहा तालुक्यातील चणेरा औद्योगिक वसाहतीत भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचा एक प्रकल्प उभारला जाणार आहे. या भेल कंपनीचा भंडारा जिल्ह्णाात एक प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने यापूर्वीच मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाचे एक युनिट आता रायगड जिल्ह्णाात सुरु करण्याचा अवजड उद्योग मंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. यासाठी राज्यसरकारची मंजुरी लागणार असून, चणेरा एमआयडीसीतील २४०० एकर जागाचे भूसंपादन करावे लागणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे कोकणात १० हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
अलिबाग- पेण रेल्वमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी येत्या १५ दिवसांत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्यासोबत बठक आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेमंत्री कोकणातील असल्याने आता या कामाला देखील गती मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्णाातील पाच गावांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती अथवा विजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा मानस असून, यासाठी काही सामाजिक संस्था आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांशी बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले. येत्या महिन्याभरात यासंदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असून मी स्वत: त्यात सहभागी होणार असल्याचेही गिते यांनी स्पष्ट केले.
भाजप-सेना युतीचे संकेत
केंद्रात जोवर मी मंत्री आहे तोवर भाजप -सेना युती कायम आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही भाजप – सेना युती व्हावी ही तर सर्वाचीच इच्छा आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यासंदर्भात बोलणी करीत आहेत. मी देखील यासंदर्भात भाजप नेत्यांशी बोलणी करतो आहे. दोन्ही बाजूने आता सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे ठोस निर्णय झाल्यावर याबाबतची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिली जाईल, असे गीते यांनी सांगीतले.  

Story img Loader