धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी म्हणून गावातील नागरिकांनी अनोळखी पाच जणांची दगडाने ठेचून हत्या केली होती. हत्या होण्याअगोदर व्हाट्सअॅपवर मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याचे संदेश प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आले होते. याच संशयावरून निरपराध पाच जणांची हत्या गावकऱ्यांकडून झाली होती. त्यामुळे व्हाट्सअॅप हे किती प्रभावी आहे याची प्रचिती आली. याचाच सकारात्मक प्रत्यय पिंपरी-चिंचवड मध्ये आला आहे.शुक्रवारी इयत्ता ६ वी च्या वर्गात शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी रस्ता भरकटले आणि तब्बल सहा तास आई वडीलांपासून त्यांची ताटातूट झाली. मात्र व्हाट्अॅपवरून दोन मुलं बेपत्ता असल्याचा संदेश वाऱ्यासारखा प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये पोहचला आणि सहा तासानंतर दोन्ही मुलं सुखरूु आई-वडिलांना मिळाली.
प्रज्वल चंदनशिवे आणि रविराज सुरवसे हे दोघे काळेवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत इयत्ता ६ वीत शिक्षण घेत आहेत. नेहमी प्रमाणे दोघे मित्र हे शुक्रवारी सकाळी सात वाजता घरातून शाळेसाठी निघाले. दुपारी शाळा सुटल्यानंतर ते शहराच्या परिसरात फिरायला गेले. दोघे फिरत असताना रस्ता विसरले आणि भरकटले. त्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली. कुटुंबियांना मुले आली नसल्याने चिंता वाटू लागली होती. काही वेळातच सर्वाना माहिती मिळाली आणि शोध मोहीम सुरू झाली. कुटुंबातील एका व्यक्तीने व्हाट्सअॅपवर काळेवाडीतील दोन मुलं बेपत्ता असल्याचा संदेश पसरवला आणि तो पाहता पाहता हजारो लाखो संख्येने पसरला.
याचा फायदा असा झाला की त्यावरून एका व्यक्तीने त्या दोघांना पिंपरी गावठाण येथे पाहिले याची माहिती प्रज्वल आणि रविराज यांच्या घरी देण्यात आली. आई-वडीलांपासून दुरावलेल्या दोघांना एकत्र आणण्याच काम व्हाट्सअॅपने केले. प्रज्वलची आई छाया चंदनशिवे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं की पिंपरी येथे दोन्ही मुलं सुखरूप असून तुम्ही त्यांना घेऊन जाण्यासाठी या असा फोन आला होता. तातडीने तेथे जाऊन आपल्या मुलाला ताब्यात घेतले.
चंदनशिवे हे कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास आहे. ते मूळचे तुळजापूर येथील आहेत. प्रज्वलचे वडील खाजगी कंपनीत काम करतात. छाया चंदनशिवे यांना प्रज्वल व्यतिरिक्त एक मुलगी आहे. मात्र मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पायाखालची जमीन सरकली होती. मात्र मुलगा प्रज्वल सापडल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सोशल मीडियाचा वापर आपण कशाप्रकारे करतो याच्यावर देखील खूप काही अवलंबून आहे. आलेला संदेश योग्य असल्याची खात्री करा आणि पुढे पाठवा जेणेकरून चांगल्या गोष्टी देखील घडतील. ज्याप्रकारे हे दोन्ही मुलं मिळण्यास सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. व्हाट्सअॅप चा योग्य वेळी योग्य वापर केल्यास चांगलं देखील घडत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे.