चिपळूण येथे आयोजित ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दोन महिने पूर्ण झाले तरीही अजून संमेलनाच्या जमा-खर्चाचे काहीही हिशेब तयार नसल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.
कोकणात २२ वर्षांनी झालेले हे संमेलन कोटय़वधी रुपयांच्या खर्चामुळे गाजले. हा खर्च वजा जाता उर्वरित निधीतून अपरांत संशोधन केंद्रासह विविध प्रकल्प उभारण्याचा मनोदय यजमान संस्था लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यासाठी किती निधी उपलब्ध होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. या संदर्भात संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख प्रकाश देशपांडे यांच्याशी महिन्यापूर्वी संपर्क साधला असता, अजून १५ दिवसांनी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले होते. आज (१३ मार्च) संमेलनाची सांगता होऊन तब्बल दोन महिने पूर्ण झाल्यामुळे देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता अजूनही जमा-खर्चाचे काहीही चित्र स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
 देशपांडे म्हणाले की, संमेलनाची विविध कामे केलेल्या कंत्राटदारांकडून अजून बिले उपलब्ध झालेली नाहीत. तसेच संस्था किंवा व्यक्तींकडून हमी देण्यात आलेल्या देणग्यांच्या रकमेचीही वसुली होऊ शकलेली नाही. त्यामुळे ताळेबंद मांडणे अजून शक्य झालेले नाही.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केलेल्या सजावटीचा आणि संमेलनाच्या मंडपाचा मिळून एकूण अंदाजित खर्च सुमारे दोन कोटी रुपये होता. संमेलनातील या सर्वात मोठय़ा रकमेच्या खर्चाची बिले नेमकी किती आली आहेत, असे विचारले असताही, अजून त्याचीही बिले आलेली नाहीत, असे उत्तर देशपांडे यांनी दिले.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उत्तर मिळू शकले नाही. मात्र त्यांच्या पुढाकारामुळे कोकण विभागातील १५ आमदारांचे प्रत्येकी पाच लाख संमेलनासाठी मिळाले. तसेच मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुमिळाले होते. चिपळूण नगर पालिका, पर्यावरण विभाग, राज्य प्रदूषण मंडळ इत्यादींकडून प्रत्येकी पाच ते दहा लाख निधी उपलब्ध झाला. खासगी उद्योग किंवा व्यक्तींकडून मिळालेल्या देणग्यांबाबत संयोजन समिती तपशील देऊ शकली नाही. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन व विकास मंडळाने संमेलनासाठी २५ लाख रुपये देण्याचा निर्णय एकमताने घेतला. पण तटकरे यांना स्वागताध्यक्ष केल्यामुळे नाराज पालकमंत्र्यांनी हा निधी रोखून धरलेला आहे. संमेलनाच्या खर्चाचा ताळमेळ लागण्यास अजून सुमारे एक महिना लागेल, असे देशपांडे यांनी आज स्पष्ट केले.  दरम्यान संमेलनासाठी गोळा झालेला निधी आणि खर्चाच्या आकडय़ांबाबत अनेक प्रकारच्या वावडय़ा उठत असून हमी दिलेल्या रकमांची वसुली न झाल्यास संमेलन तोटय़ातही जाऊ शकण्याची भीती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा