केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाडय़ातून गोपीनाथ मुंडे (बीड) व रावसाहेब दानवे (जालना) या दोघांचा प्रथमच समावेश झाल्याच्या वृत्ताने बीड व जालना या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी जल्लोष करण्यात आला. ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. औरंगाबाद शहरातही भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभा राहणारा नेता अशी मुंडे यांची ओळख आहे. मोदी लाटेत महायुतीचे नेतृत्व करताना मुंडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळताना आरोपांची राळ उडवली. बीड मतदारसंघात मुंडे यांना खिंडीत पकडण्याची व्यूहनीती राष्ट्रवादीने आखली होती. या पाश्र्वभूमीवर मुंडे यांनीही राज्याच्या राजकारणावर प्रचारादरम्यान कलाटणी दिली. त्याचे फळ म्हणून मंत्रिपद मिळाल्याची भावना बीडमधील जनता व्यक्त करीत आहे. भाजपशी एकनिष्ट राहत सातत्याने निवडून येणाऱ्या जालन्याचे रावसाहेब दानवे यांनाही प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने मराठवाडय़ाचा विकासातील मागासलेपणा दूर होण्यास आता मदत होईल, असा दावा भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.
मुंडे यांना कोणत्या खात्याचे मंत्रिपद मिळणार, याविषयी कमालीची उत्सुकता होती. दुपारनंतर त्यांना ग्रामविकास मंत्रालयाचा कारभार दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली. मराठवाडय़ात बीड व जालना हे दोन्ही मागासलेले जिल्हे समजले जातात. जालन्यामध्ये स्टील उद्योग मोठय़ा प्रमाणात आहे. व्यापारही मोठा आहे. त्यामुळे त्याला चालना देणारे निर्णय होतील, असे मानले जात आहे, तर बीडच्या केंद्र सरकारकडील मागण्यांचा आता जोरदार पाठपुरावा होईल, असा दावा कार्यकर्ते करीत आहेत.

Story img Loader