औरंगाबाद शहरात रविवारी (५ जून) सकाळी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. बेगमपुरा हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पोत्यात आढळला. दुसरीकडे सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीचा डोक्यात वरवंट्याचा घाव घालून खून केल्याची घटना घडली.
हिमायतबाग परिसरात लच्छू पहेलवान यांचे शेत असून जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आढळून आलेला प्रकार खुनाचा असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीमध्ये पाठवण्यात आला आहे. जळालेल्या अवस्थेतील मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगरमध्ये मीना मच्छिंद्र पिटेकर (वय ५०) या महिलेचा खून करण्यात आला. पती मच्छिंद्र यानेच चारित्र्याच्या संशयावरून मीना यांच्या डोक्यात वरवंट्याचा घाव घातला. त्यामध्ये मीना यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मुलगी शिवकन्या सिंग हिने पोलिसांना दिली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
ज्येष्ठ महिलेचा पैशांसाठी खून
बिडकीन येथील भारत नगरमध्ये एकट्याच राहणाऱ्या हलिमाबी वजीर शेख (वय ७५) यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत २ जून रोजी आढळून आला होता. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा शेख शामीर शेख वजीर (रा. जांभळी ता. पैठण) यांच्या फिर्यादीवरून बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिडकीन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात शेख कुटुंबीयांच्या परिचितांमधीलच गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील रहिवासी शेख राजू शेख ईसाक याला अटक केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांकडून दिली.
हेही वाचा : विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या
शेख राजू याने पैसे, दागिन्यांसाठी खून केल्याची कबुली दिली. हलिमाबी यांना उसने पैसे मागितले होते. मात्र, ते देण्यास नकार दिल्याने हलिमाबी यांचे डोके आदळून खून केला. अपघात वाटावा म्हणून घरातील वस्तूंना आग लावली व हलिमाबी यांच्या अंगावरील दागिने घेऊन पळालो, अशी कबुली राजू शेख यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.