दापोली : संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणे दोन इसमांना महागात पडले असून वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कुंभवे ता. दापोली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे अवैधरित्या शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या राहते घराचे मागील बाजूस रान कोंबड्याची शिकार झालेबाबत वन अधिकारी यांना कळविण्यात आले. त्या माहितीच्या आधारे वन अधिकारी यांनी जागेवर जावून वस्तुस्थितीची पाहणी केली असता, तक्रारदार यांचे राहते घराचे मागील बाजूस १०० मीटर अंतरावर असणारे रुपेश भिकु झाडेकर यांचे राहते घराकडे दोन इसम रान कोंबडा शिकार करून घेवून गेले असल्याचे तक्रारदार यांनी समक्ष दाखविले. त्या नुसार रुपेश भिकु झाडेकर यांचे पडवीमध्ये जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन इसम संशयित नितीन शांताराम झाडेकर (वय ३४) रा. कुंभवे ता. दापोली जि. रत्नागिरी आणि संशयित आशिष अशोक पेडमकर (वय ३२) रा. वाकवली ता. दापोली जि. रत्नागिरी हे जखमी अवस्थेतील रानकोंबडा व छऱ्याचे बंदुकीसह आढळून आले. त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांचेवर वन्यजीव (संरक्षण) १९७२ -सुधारणा – २०२२ कलम २, ९, ३९, ४८, ५०, ५१, ५२, ५७ अन्वये आर.डी. खोत वनपाल दापोली यांचेकडील वन अपराध क्रमांक ०८/२०२५ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेणेत आला आहे.
ही कारवाई गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा), रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश ग. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, रामदास द. खोत, वनपाल दापोली, शुभांगी रा. भिलारे, वनरक्षक ताडील, सुरज दि. जगताप, वनरक्षक बांधतिवरे, वि. द. झाडे, वनरक्षक खेर्डी, शुभांगी दा. गुरव, वनरक्षक कोंगळे यांनी पार पाडली.
आपल्या आजुबाजुला वन्यजीव शिकार होत असल्यास त्वरीत वन विभागाचे टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा. नावे गुप्त ठेवणेत येवून बातमीदारास गुप्त सेवा निधी मधून बक्षीस देणेत येईल. नागरिकांना असे आवाहन करणेत येते आहे.