मोबाईलवर सेल्फी काढण्याचं फॅड गेल्या काही वर्षांमध्ये बरंच वाढलं आहे. पण त्यासोबतच दुर्दैवाने सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यामध्ये काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांमध्ये सोमवारी आणखी एका घटनेची भर पडली आहे. मावळमध्ये एक ८ वर्षांचा मुलगा सेल्फी काढताना पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचे वडिल आणि मामांचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये मुलाचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे मावळ भागामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सेल्फी जीवघेणा ठरत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

नेमकं झालं काय?

ही घटना घडली मावळमधल्या कुंडमळा येथे. राकेश लक्ष्मण नरवडे (३६) आपला ८ वर्षांचा मुलगा आयुष नरवडे आणि त्याचे मामा वैष्णव भोसले (३०) यांच्यासोबत कुंडमळा येथे फिरायला गेले होते. यावेळी जवळच्या पाण्याच्याय प्रवाहाजवळ उभं राहून आयुष सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण दगडांचा अंदाज न आल्यामुळे आयुष घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला. यामुळे घाबरलेल्या राकेश आणि वैष्णव यांनी कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी घेतली.

हा सगळा प्रकार लक्षात येताच जवळच मासे पकडणाऱ्या काही व्यक्तींनी पाण्यात दोरी टाकून मुलाला बाहर काढलं. पण मुलाचे वडील राकेश नरवडे आणि मामा वैष्णव भोसले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचाही शोध न लागल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. शेवटी कुंडमळ्याच्या प्रवाहातच पुढे त्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

जीवघेणा सेल्फी… लोणावळा, मावळमध्ये अतिउत्साही पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन

सेल्फीसाठी पर्यटकांचे जीवघेणे स्टंट!

लोणावळा, मावळसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धबधबे, नद्या ओसंडून वाहत आहेत. हा सर्व परिसरस सध्या डोंगर-दऱ्या हिरवळीने नटलेला आहे. हेच दृश्य आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी शेकडो पर्यटक करोनासंदर्भातील निर्बंध झुगारून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, अनेक पर्यटक फोटोंसाठी, सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचं चित्रही दिसत आहे. ओसंडून वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, हे प्रकार पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचं वारंवार समोर येत आहे.

Story img Loader