लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : कर्जत येथे उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. रुपेन सुब्बा आणि विवेक सिंह रावत अशी दोघांची नावे आहेत. दोघेही रेडीसन ब्ल्यू हॉटेल मध्ये आचारी म्हणून कार्यरत होते.

उष्णता वाढली असल्याने दोघेही सोमवारी रात्री हॉटेल मागून वाहणाऱ्या नदीत पोहण्यासाठी गेले होते. सकाळपर्यंत दोघेही परत आले नाहीत. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने दोघांचा शोध सुरू केला. कर्जत पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटना स्थळी शोध घेत विवेक सिंह रावत याचा मृतदेह शोधून नदीपात्रातून बाहेर काढला.

मात्र या घटनेत बुडालेल्या रुपेन याचा शोध लागला नाही. त्यामुळे खोपोली येथून शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी नदी पात्रात उतरून रुपेन शोध घेत, त्याचा मृतदेह बाहेर काढला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कर्जत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.