नगरः धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण, तसेच आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दोघांनी नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे गुरुवारी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या दोघांचा शोध घेतला जात होता. शोधकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या पथकाला पाचारण केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. प्रल्हाद चोरमारे (रा. छत्रपती संभाजीनगर) व बाळासाहेब कोळसे (रा. पाथर्डी, नगर) अशी उडी मारणाऱ्या आंदोलकांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील वातावरण तणावाचे बनले असून, आंदोलकांनी पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरत घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.
नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे आरक्षण मागणीसाठी धनगर समाजातील प्रल्हाद चोरमारे, बाळासाहेब कोळसे यांच्यासह राजू तागड, रामराव कोल्हे, भगवान भोजने व देवीलाल मंडलिक या सहा जणांनी १८ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रश्नी निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर आज आंदोलक पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गोदावरी पुलावर जमा झाले. या वेळी वरील आंदोलकांनी गोदावरी नदीमध्ये उडी मारली. संबंधितांच्या मोटारीमध्ये धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून आम्ही जलसमाधी घेत असल्याचा मजकूर असलेली चिठ्ठी मिळाली आहे.
हेही वाचा >>>आरसीएफ शाळेचा प्रश्न हातघाईवर…आमदार दळवींच्या पत्नीचा शिक्षण अधिकाऱ्यांवर रोष
दरम्यान, हा प्रकार समजताच घटनास्थळी आंदोलकांची मोठी गर्दी झाली. त्यांनी निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. काही वेळातच या आंदोलकांनी पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला. घटनेची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळाली. त्यांनी फौजफाट्यासह प्रवरा संगम येथे धाव घेतली. त्या पाठोपाठ तहसीलदार संजय बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, प्रांताधिकारी सुधीर पाटील, धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर घटनास्थळी पोहोचले.
प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोळसे व चोरमारे यांचा नदीपात्रात शोध सुरू केला. परंतु धरणातून पाणी सोडले असल्याने आणि त्यातच पाऊस सुरू असल्याने नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. यातच जायकवाडी धरणातील पाण्याचा फुगवटा प्रवरा संगमपर्यंत आलेला आहे. त्यामुळे शोधकार्यात मर्यादा आल्या होत्या.
हेही वाचा >>>मिरजेत जमावाकडून हॉटेलवर हल्ला, तोडफोड; मारहाणीत आठ जण जखमी, व्यावसायिक स्पर्धेतून प्रकार
दरम्यान, ही घटना समजताच सर्वत्र खळबळ उडाली. नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, तसेच मराठवाड्याच्या अन्य भागांतून धनगर समाज मोठ्या प्रमाणात प्रवरा संगमावर जमा झाला. संतप्त तरुणांनी पुलावरच ठाण मांडून वाहतूक रोखून धरली. रात्री उशिरा ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले. त्यांच्यामार्फत दोघा आंदोलकांचा शोध घेण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षण मागणीसाठी तोच पूल
मराठा आरक्षण मागणीसाठी याच प्रवरा संगम येथील पुलावरून काकासाहेब शिंदे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी सहा वर्षांपूर्वी सन २०१८ मध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली. पुन्हा त्याच पुलावर धनगर आरक्षण मागणीसाठी दोघांनी उडी मारल्याचा संशय घेतला जात आहे.-मुख्यमंत्री आज नगरमध्ये
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उद्या, शुक्रवारी नगर जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा मेळावा, तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी ही घटना घडल्याने चर्चा होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
आठ दिवसांपूर्वीच आम्ही धनगर आरक्षण मागणीसाठी पत्रकार परिषद घेऊन उपोषण व जलसमाधीचे आंदोलन जाहीर केले होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली.-अशोक कोळेकर, धनगर आरक्षण नेते