कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थिनींचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तालुक्यातील चास येथे ही घटना घडली. या दोन्हीही विद्यार्थिनी भैरवनाथ विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होत्या.
पुनम अशोक शिंदे (वय १५) व जयश्री कैलास पाबळे (वय १४) या दोघी मैत्रिणी मंगळवारी दुपारी मुळा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीत पाणी नसले तरी पात्रातील वागळ डोहात असणाऱ्या पाण्याचा वापर धुण्यासाठी केला जातो. या दोघी विद्यार्थिनी कपडे धुण्यासाठी पलिकडच्या किनाऱ्यावर गेल्या होत्या. कपडे धूत असताना त्यातील एकीचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिची मैत्रीणही पाण्यात पडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघीजणी बुडाल्या. दुपारची वेळ असल्याने नदीवर वर्दळ नव्हती. पण पलिकडच्या किनाऱ्यावर असणाऱ्या एका छोटय़ा मुलीने हा प्रकार पाहिला. त्यामुळे इतरांना ही घटना समजली. दोघींनाही गावकऱ्यांनी बाहेर काढले पण त्या मृत झाल्या होत्या.
अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील जयश्री पाबळे ही विद्यार्थिनी संगमनेर तालुक्यातील वनकुटे येथील रहिवासी असून शिक्षणासाठी ती मामाकडे राहत होती. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. गतवर्षीही दोन महिलांचा अशाच प्रकारे नदीत बुडून मृत्यू झाला होता.

Story img Loader