पोहता येत नसताना उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे उघडकीस आली. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे पार्थिव आज सकाळी मालेवाडी जॅकवेलच्या ठिकाणी बचाव पथकाला मिळाले.
हेही वाचा >>> यंदा मान्सून चांगला, पण…; भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज काय? जाणून घ्या..
अमोल प्रकाश सुतार (वय १६) व रविराज उत्तम सुतार (वय १२) ही नात्याने मावस भाउ असलेली दोन मुले वैरण काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी वारणाकाठी असलेल्या शेतात गेली होती. सायंकाळ पर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शोध घेतला असता नदीकाठी चप्पल, कपडे आणि भ्रमणध्वनी या वस्तू आढळून आल्या. यामुळे मुले नदीत उतरली असतील या शक्यतेने शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने शोध थांबविण्यात आला.
हेही वाचा >>> सांगली : खराब झालेल्या ॲक्सिलेटरला दोरी बांधत आणि वेग नियंत्रित करत धावली एसटी
आज सकाळी पुन्हा मुलांचा शोध बचाव पथकामार्फत सुरू करण्यात आला. यावेळी बचाव पथकाला मालेवाडी जॅकवेल नजीक दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. याबाबत कुरळप पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या मुलापैकी रविराज सुतार हा मुळचा राजमाची (ता. कराड) येथील रहिवाशी असून उन्हाळी सुट्टीसाठी तो मावशीकडे तांदुळवाडीला आला होता. वाढत्या उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी दोन्ही मुले वारणा नदीपात्रात उतरली होती. दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा बुडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.