वाई : महाबळेश्वर प्रतापगड घाट रस्त्यावर मेटतळे गावाच्या हद्दीत टेस्ट राईड साठी आलेल्या टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळला. या अपघातात वाहन चालक व कंपनीचे अभियंता व बचाव कार्य करणारे दोघे असे चार जण गंभीर जखमी झाले. या अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला. दैव बलवत्तर म्हणून दोघांचे प्राण वाचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी चिंचवड येथील टाटा कंपनी मधून टेस्ट ड्राईव्ह साठी तीन गाड्या महाबळेश्वर प्रतापगड घाट रस्त्यावर आल्या होत्या.या गाडयांपैकी एक गाडीच्या चालकाला आंबेनळी घाटात मेटतळे गावापासून एक किमी अंतरावर अरुंद रस्ता असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. टेम्पो संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळला.या टेम्पो मधून वाहन चालक व अभियंता अशा दोन व्यक्ती प्रवास करत होत्या. टेम्पो दरीत कोसळल्याचे मागून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाने पाहिले आणि त्याने पोलिसांना याची खबर दिली.

हेही वाचा…“विजय शिवतारेंनी खुशाल निवडणूक लढवावी, पण..”, उमेश पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

सदर घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस ,महाबळेश्वर ट्रेकर्स , सह्याद्री ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले .त्यांनी ७०० फूट खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोन्ही इसमांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी बचाव कार्य करणारे दोन कार्यकर्ते घसरून जखमी झाले. दरीतून चालक देवदत्त वाघ ( जळगाव हल्ली राहणार पुणे) अभियंता जितेंद्र खाणे (पुणे) बचाव कार्य करणारे युवक व सिताराम शिंगरे व सोमनाथ वाघदरे यांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना पुढील उपचारासाठी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. बचाव कार्य सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two severely injured as tempo plunges into ravine on mahabaleshwar pratapgad ghat road 2 rescue workers hurt psg