विजेचे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे चपलांची दोन दुकाने भस्मसात झाली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन्ही दुकानांचे एकूण सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
टाकळी ढोकेश्वरच्या बसस्थानक चौकातील कैलास फूट वेअरमध्ये रात्री नऊच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. विजेचा दाब वाढल्याने शॉर्टसर्किट झाले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कैलास फूट वेअरचे मालक मंगेश सुदाम देशमुख तसेच शेजारच्या शिवकृपा जनरल व चप्पल मार्टचे मालक सुभाष निवडुंगे हे सोमवारी आपापली दुकाने बंद करून घरी गेल्यानंतर कैलास फूट वेअरमधून धूर तसेच वास येत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. दुकानदारांना नागरिकांनी बोलावून आणेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. शेजारच्या शिवकृपा जनरल स्टोअपर्यंत आगीचा वणवा पोहोचून या दुकानासही आग लागली. सरपंच शिवाजी खिलारी यांनी नगर महानगरपालिकेस संपर्क करून अग्निशमन बंब पाठविण्याची विनंती केली. उपसरपंच विलास झावरे, मंगेश खिलारी यांनी नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. टँकरने पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते, परंतु ते अपुरे पडले. आगीचा बंबही लवकर न आल्याने कैलास फूट वेअर पूर्णपणे जळून भस्मसात झाले तर शिवकृपा स्टोअर्समधील सुमारे सत्तर टक्के माल जळून खाक झाला.
ही आग इतर दुकानांपर्यंत पोहोचू नये यासाठी जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही दुकाने पाठीमागील ओढय़ात ढकलण्यात आली. दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी ग्रामस्थांना सहकार्य केले.

Story img Loader