सांगली : भिलवडी येथे पाणवठ्यावर पोहण्यास गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना बुधवारी (२५ मे) घडली. यापैकी एका मुलीला वाचविण्यात यश आले असले, तरी एका मुलीचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिलवडीतील साठेनगरमध्ये राहणार्‍या चांदणी (वय १०) व देवयानी मल्हारी मोरे (वय ११) या दोघी सख्ख्या बहिणी बुधवारी (२५ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अन्य मुलांसोबत साखरवाडी येथील पाणवठ्यावर पोहण्यासाठी गेल्या होत्या. दोघीही खोल पाण्यात पोहत होत्या. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही बुडू लागल्या.

यावेळी पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. यामुळे मच्छिमारी करणार्‍या अजित फकीर यांने चांदणी या मुलीला बाहेर काढले. अन्य लोकांनी देवयानीला पाण्याबाहेर काढले. मात्र दोघी बहिणी या घटनेनंतर बेशुध्द पडल्या होत्या.

हेही वाचा : नांदेड : कंधार शिवारात दोन शालेय विद्यार्थ्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

दोघींना तात्काळ सांगलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यापैकी चांदणी ही शुध्दीवर आली असून देवयानीचा मृत्यू झाला.

Story img Loader