अलिबाग – मालमत्ता आणि नोकरीच्या आड येणाऱ्या सख्या बहिणींवर विषप्रयोग करून त्याने त्यांचा काटा काढला, नंतर कौटुंबिक वादातून काकीने विषप्रयोग केल्याचा बनाव रचला, दृष्यम चित्रपटातील कथानकाला लाजवेल अशी आखणी त्याने केली. पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि त्याला गाठलेच.
१६ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात सोनाली शंकर मोहीते हिला विषबाधा झाल्याने अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले, पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन आणि इन्केस्ट पंचनामा करून तिचा मृतदेह भावाच्या ताब्यात देण्यात आला. रेवदंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
हेही वाचा – “जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सरकारला फोडाफोडीचं राजकारण…”, अनिल देशमुख यांची बोचरी टीका
दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबरला तिची बहीण स्नेहा शंकर मोहीते हिला उलट्यांचा त्रास होत असल्याने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण तिचाही उपचारादरम्यान विषबाधेमुळे मृत्यू झाला.
दोन दिवसांत दोन सख्या बहिणींचा विषबाधेने झालेले मृत्यू संशयास्पद होते. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण सरळ नसल्याची कुणकुण लागली होती. २० ऑक्टोबरला दोन्ही मृत मुलींच्या आईने नातेवाईकांविरोधात विषप्रयोग केल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही या दोन कुटुंबात वाद झाले होते. त्या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. त्यामुळे संशयाची सुई शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडे जाणे स्वाभाविक होते.
दोन मुलींच्या संशयास्पद मृत्यूची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी पाचारण केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, धनाजी साठे, विकास चव्हाण यांच्या पथकाकडे तपासाची सूत्रे सोपविली. मुलींची आई आणि भाऊ यांचे जाबाब नोंदविण्यात आले. यावेळी काकीने विषप्रयोग करून आपल्या बहिणींना मारल्याचा दावा दोघांनी केला होता. याच बाबीवर पोलिसांनी सुरवातीला तपास केला.
पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. आसपासच्या परिसरात विचारणा केली पण, त्यात बाहेरील व्यक्ती कोणीही या घरात आल्याचे आढळून आले नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे तपास पथकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी तपासाची चक्रे उलट्या दिशेने सुरू केली. लहान बहीण स्नेहा हिच्यावर उपचार सुरू असताना तिने पोलीस जबाब तपासला. त्यात भाऊ गणेश मोहीते याने सूप आणि आईने पिण्याचे पाणी दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उलट्यांचा त्रास सुरू झाल्याचे सांगितले होते. या जबाबानुसार तपासाला पोलिसांनी सुरवात केली. आधी मृत मुलींची घरझडती घेतली. नंतर आई आणि मुलाला बोलावून सखोल चौकशी केली.
घरझडती दरम्यान सोनालीच्या कपाटात वनविभाग आणि पोलीस विभागात दिलेली काही पत्रे आढळून आली. ज्यात भाऊ गणेश विरुद्ध केलेल्या तक्रारींचा समावेश होता. वनविभागात अनुकंपा तत्वावर नोकरीत लागण्यासाठी बहिणी आणि आईला अंधारात ठेऊन गणेशने नोकरी मिळवल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन्ही बहिणी त्याच्या विरोधात तक्रारी करत होत्या. चौकशी सुरू होताच गणेशच्या वागणुकीत बदल झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचा फोन जप्त करून तपासणी केली. तेव्हा त्याने १ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीतल तब्बल ५३ वेळा गुगलवर विषारी द्रव्यांची माहिती शोधल्याचे दिसून आले. चव असलेले, चव नसलेले, वास असलेले, वास नसलेले, अशी वेगवेगळी माहिती त्याने यात तपासली होती. झोपेच्या गोळ्या आणि विषामुळे किती दिवसांत मृत्यू होतो याचा शोधही त्याने गुगलवर घेतला होता. त्यामुळे गणेशच या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याच्या गाडीत उंदीर मारायचे औषध आढळून आले. त्यामुळे गणेश यानेच विषप्रयोग करून दोन्ही बहिणींच्या हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
गणेश याचे वडील वनविभागात नोकरीला होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरीला गणेश लागला होता. राहते घरही त्याने स्वत:च्या नावावर करून घेतले होते. यावरून दोन्ही बहिणी आणि त्याच्यात सतत वाद होत होते. यातून विषप्रयोग करून त्याने बहिणींचा काटा काढला. पोलिसांनी गणेश मोहीते याला अटक केली असून त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
काकीने बहिणींवर विषप्रयोग केल्याचा दिखावा गणेशने रचला होता. आई आणि बहिणींना तसे जबाब देण्यास त्याने सांगितले होते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याला जेरबंद केले. बहिणींना दोन महिन्यांपासून तो स्वतः सूप करून खायला देत होता. त्यामुळे याच सूपातून आपल्यावर विषप्रयोग केला जाईल याची चाहूल बहिणींना नव्हती.