मध्यप्रदेशातील दोन हजार मजुरांची रेल्वेने साताऱ्यातून रवानगी करण्यात आली. सातारा जिल्हा प्रशासनाकडे 1200 कामगारांनी नोंद केली आहे. मात्र आज दोन हजारावर मजूर रवाना झाले असावेत असा प्रशासनाचा अंदाज आहे.
परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी पाठविण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातून पहिली रेल्वे आज सायंकाळी रवाना झाली.
उद्योगधंदे बंद झाल्याने व हाताला काम नसल्याने अनेक मजूर, कामगार बेकार झाले आहेत. मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्याची सोय हे मजूर करत आहेत. कोणी चालत निघाले, कोणीं खासगी वाहन करून चालले आहेत. या निघालेल्या कामगारांमधून काहींनी रेल्वेची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने रेल्वे वाहतुकीला परवाना मिळतो की नाही? यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर रेल्वे करता सोमवारी सायंकाळी परवानगी मिळाली. जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सायंकाळी पाच वाजता मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी रेल्वे असून 1200 मजूर जाणार आहेत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातून बाहेर राज्यात सोडण्यात येणारी ही पहिलीच रेल्वे आहे.
आज सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, फलटण, जावली, कोरेगाव, खटाव, माण, कराड, पाटण तालुक्यातून तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी यांनी परिश्रम घेऊन त्या त्या तालुक्यातून मध्यप्रदेशच्या नोंद झालेल्या कामगारांची एसटी ने मोफत सातारा रेल्वे स्थानकांपर्यंत रवानगी केली. यासाठी एस टी अधिकाऱ्यांनीही परिश्रम घेतले.सकाळपासून रेल्वे स्थानकांपर्यंत कामगार पोहोचविण्याची गडबड सुरु होती. तेथून पाच वाजता मध्यप्रदेशकडे जाणारी रेल्वे रवाना झाली.