गट विमा योजनेअंतर्गत महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनाने अपघात विमा योजना लागू केली असून कोकणातील सुमारे एकवीसशे कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकेल. महावितरणचे तांत्रिक कर्मचारी अनेकदा जीव धोक्यात घालून जिवंत वाहिन्यांवर काम करत असतात. अशा वेळी आवश्यक खबरदारी घेऊनही काही कर्मचारी अपघाती मृत्युमुखी पडतात. तसेच अनेकांना कायमचे अपंगत्व येते. म्हणून महावितरणने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत गेल्या १७ नोव्हेंबरपासून ही योजना लागू केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विमा पॉलिसीची रक्कम दोन लाख रुपये आहे.
या विम्याचा हप्ता महावितरणतर्फे भरण्यात आला आहे. कामावर असताना अपघाती मृत्यू होणाऱ्या किंवा कायमचे अपंगत्व येणाऱ्या कर्मचाऱ्याला या योजनेव्दारे शंभर टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई कायद्यांतर्गत मिळणाऱ्या भरपाईव्यतिरिक्त ही रक्कम आहे.