परभणी : दोन वेळा अपक्ष आमदार झालेले आणि यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी आमदार सिताराम घनदाट यांनी मंगळवारी (दि.१८) मुंबई येथे प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदकिशोर बलोरे, सुरेश भुमरे, जिल्हा उपाध्यक्ष रवी जोशी, प्रशांत फड, रुपेश शिनगारे, नरहरी ढोणे यांच्यासह गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
माजी आमदार घनदाट हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते. विधानसभेला या मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीची कास धरली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. घनदाट यांनी यापूर्वी दोन वेळा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मतदारसंघात त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. सिताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्षही आहेत. तीन महिन्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती धरला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. रासप हा भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे. या मतदारसंघात कायम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे गुट्टे यांच्या विरोधात तक्रारी करत असतात. रासप विरुद्ध भाजप असा संघर्ष या मतदारसंघात वारंवार पाहायला मिळतो त्या पार्श्वभूमीवर आता घनदाट यांची नव्याने भर पडली आहे त्यामुळे भविष्यातील या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी असतील याबाबतही मोठी उत्सुकता आहे.