माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यात पोहण्यास आलेल्या पर्यटकांपकी दोन पर्यटकांचा तोल जाऊन ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडाले. मात्र संध्याकाळी साडेसात वाजले तरीही त्यांचा शोध काही लागला नाही. वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत शोध सुरु असल्याची माहीती माणगाव पोलीसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने हजारोच्या संख्येने माणगाव येथील देवकुंड धबधब्यावर पर्यटक फिरण्यास आले होते. वाहत्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी रायगडसह मुंबई, पुणे, दिल्ली येथील पर्यटकांनी रविवारी या धबधब्यावर गर्दी केली होती. दिल्ली येथील आर्मी दलातील पंधरा जणांचा ग्रुप व पुणे येथील शेकडो विद्यार्थी रविवारी सकाळी देवकुंड धबधब्यावर फिरण्यास आले होते. दुपारी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना आर्मी दलातील अखिल चौधरी रा. दिल्ली व पुणे येथील विद्यार्थी बीपीन पाठक वय 23 वष्रे या दोन पर्यटकांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले.
ही बाब तेथील स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाण्यात बुडून गेले. या घटनेची माहिती माणगाव पोलीसांना मिळताच पोलीसांनी अन्य यंत्रणेमार्फत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली दुपारपासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांचा शोध सुरुच होता. तरीही ते दोघेही सापडले नाही. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.