लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली: मालट्रकला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार झाला तर, तिघेजण जखमी झाले. हा अपघात रत्नागिरी-नागपूर महामार्गावर गुरूवारी पहाटे घडला. अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.
दोन्ही ट्रक नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरहून कोल्हापूरकडे निघाले होते. गुरूवारी पहाटे फरशी वाहतूक करणारा ट्रकने अॅसिड वाहतूक करीत असलेल्या मालट्रकला धडक दिली. यानंतर दोन्ही वाहने महामार्गावरून दहा फूट खाली असलेल्या शेतात जाउन कोसळली. धडक इतकी जोरदार होती, की अॅसिड घेउन निघालेला ट्रक उलटा होउन कोसळला, तर अॅसिडचे काही बॅरेल महामार्गावर पडले होते.
या अपघातात संतोष चनाप्पा उर्फ नागाप्पा सिध्दणसेर (वय ३६ रा. बिदर) हा जागीच ठार झाला, तर सुर्यकांत बोरड (वय ३६) आणि रवि सांगुलकर हे दोघे डोळ्यात अॅसिड जाउन जखमी झाले. या अपघातामध्ये आकाश माळी हा उलट्या स्थितीत पडलेल्या अॅसिड बॅरेलने भरलेल्या ट्रकखाली सापडला होता. बचाव पथकाने कटरच्या मदतीने त्याला बाहेर काढून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.