परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधनात देशपातळीवर क्षेत्रवाढीस दोन नव्या करडई वाणांना अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) व पीबीएनएस १८४ अशी या वाणांची नावे असून या वाणांना केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता, वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या ९३ व्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
या वाणांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये (झोन-१) लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून, पीबीएनएस १८४ वाणाला झोन-२ अंतर्गत इतर प्रमुख करडई उत्पादक राज्यांमध्येही लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाल्याचे विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम व गुणवत्तापूर्ण करडई वाण मिळतील, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल अशी प्रतिक्रिया डॉ. इंद्र मणी यांनी दिली.
या वाणांचे बियाणे लवकरच राष्ट्रव्यापी स्तरावर उत्पादनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध होतील, जे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध करून देतील असे संशोधन संचालक डॉक्टर खिजर बेग यांनी सांगितले. या वाणांच्या विकासामध्ये डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल तसेच अखिल भारतीय समन्वित करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे याबाबतीत योगदान आहे.पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) या वाणाला ६ मार्च २०२३, तर पीबीएनएस १८४ वाणाला ३१ ऑगस्ट २०२२ रोजी अधिसूचित करण्यात आले होते. या नव्या वाणांचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प असून, हे वाण देशातील करडई उत्पादनामध्ये एक नवीन अध्याय उघडतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अशी आहेत वाणांची वैशिष्ट्ये :
पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा)
पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हा वाण १२४ ते १२६ दिवसांत परिपक्व होत असून याचे कोरडवाहू मध्ये उत्पादन १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते. या वाणाचे तेलाचे प्रमाण सुमारे ३०.९० टक्के असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे. या वाणाच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये मावा कीडीस प्रतिकारक्षमता, पानावरील ठिपके व मर रोगांवरील सहनशीलता आहे.
पीबीएनएस १८४
कोरडवाहू क्षेत्रात १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारा पीबीएनएस १८४ हा नवा वाण बागायती भागात १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के इतके असून, १२० ते १२४ दिवसांमध्ये परिपक्व होतो. यामध्ये विशेष बाब म्हणजे, मर/उबळी रोगास व मावा कीडीस प्रतिकारक्षम, पानावरील ठिपके रोगास सहनशील आहे.