सांगली : जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुण ठार झाले असून एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार कोसारी येथील चार तरुण एका दुचाकी वरुन जतहून गावी निघाले होते. बिरनाळ ओढ्याजवळ वळणावर दुचाकी वरील चालकाचा ताबा सुटला. या अपघातात दुचाकी चालवत असलेला अजित भोसले (वय 22) हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेले मोहीत तोरवे (वय 21) आणि राजेंद्र भाले (वय 22 )यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
हेही वाचा >> विदर्भात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण; राज्यात मान्सूनची स्थिती काय?
या अपघातात संग्राम तोरवे (वय 16) हा गंभीर जखमी झाला असून त्याला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ठार झालेल्या तरुणांच्या पार्थिवावर रविवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.