लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला दुचाकी ठोकरल्याने एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी टँकर चालकाविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जिप्सीसमोर वाहतुकीस अडथळा ठरेल या पध्दतीने टँकर (एमएच ५०-४८४९) लावण्यात आला होता. या टँकरला कराडकडे निघालेल्या दुचाकी (एमएच १० डीएक्स ९२७६) ने ठोकरले. यामध्ये गार्गी रवींद्र पाटील ही पाच वर्षांची मुलगी रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाली तर दुचाकी चालक रोहन राजेंद्र पाटील (वय २४) हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी टँकर चालक सचिन पाटील याच्याविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.