बेदरकार तरुणांना आवर घालण्याची डहाणूतील स्थानिकांची पोलिसांकडे मागणी
डहाणू : डहाणू समुद्रकिनारी सध्या दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीमुळे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे जेष्ठ नागरिक आणि पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी काही तरुण बेदरकारपणे दुचाकीच्या दामटवतात. त्यामुळे नागरिकांना येथे जीव मुठीत घेऊनच चालावे लागत आहे. बेलगाम दुचाकीस्वारांना पोलिसांनी आवर घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
डहाणू समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. यात महिला, लहान मुलांचा समावेश असतो. याशिवाय सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकही किनाऱ्यावर येतात. याच वेळी काही हुल्लडबाज दुचाकीस्वार वाळूमधून भरधाव दुचाकी चालवतात. काहींनी तर काही दिवसांपासून हैदोस घातलेला आहे, अशी अप्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.
काही वेळेला येथे आलेले पर्यटक वाळूवर फिरण्याचा आनंद घेणे सोडून किनाऱ्याबाहेरच्या जागेतच उभे राहतात. काही जण मुलांना घेऊन समुद्रकिनारी येतात, परंतु मनात स्टंटबाज दुचाकीस्वारांचे भय असते. त्यामुळे दूरवरून येऊनही किनाऱ्यावर आनंद लुटता येत नसल्याची खंत काही पर्यटकांनी व्यक्त केली.
स्टंटबाज दुचाकीस्वारांना कोणी रोखल्यास ते त्याच्याशी वाद घालतात. कधीकधी ज्येष्ठ नागरिकांशी तरुण असभ्य भाषेत बोलतात आणि तेथून पळ काढतात.
हुल्लडबाज दुचाकीस्वारांची दहशत असतानाच डहाणू समुद्र किनाऱ्यावर गर्दुल्यांचा उपद्र वाढू लागला आहे. याबद्दल जेष्ठ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डहाणू स्थानिक करीत आहेत.
या भागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे, तसेच पारनाका येथे पोलिसांची चौकी आहे. मात्र गेले काही दिवस या घटनांना रोखण्यासाठई पोलिसांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
डहाणू समुद्र किनार्यावर संध्याकाळी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र समुदरकिनार्यावर दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीमुळे नागरिकांमध्ये भीती आहे.
-महेंद्र ओझा, स्थानिक रहिवासी