सांगली: जमिन हडप केल्याच्या तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याच्या कारणावरून दोन महिलांनी आत्मदहन करण्याचा प्रकार इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. पोलीसांनी सतर्कता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला असून दोन्ही महिलांना परावृत्त करीत पोलीसांनी समज दिली आहे.
कापूसखेड रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून पूजा ऋतुराज धुमाळे (वय २३) आणि आरती प्रवीण धुमाळे (वय ३०) या दोन महिलांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या प्रवेशदारात केला. दोघी महिला नणंद-भावजय असून गुरूवारी दुपारी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली. पोलीसांनी डिझेल ओतून पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेच्या हातातील आगपेटी काढून घेतली आणि या महिलांना ताब्यात घेतले. यानंतर दोघींनाही ताब्यात घेउन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून दोघींना समज देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.
धुमाळे कुटुंबाचे कापूसखेड रस्त्यावर शेत आहे. धुमाळे कुटुंबाच्या या जागेलगत असणार्या भूखंडाला संरक्षित करण्यासाठी खांब रोवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत कारवाई करावी अशी या महिलांची इच्छा होती. यातूनच पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा समज करून घेउन या महिलांनी आततायी मार्गाचा अवलंब करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला.