सांगली : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर टेम्पो आणि ट्रक या दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला मजूर ठार तर दोन पुरुषासह नऊ जण जखमी झाले. रविवारी रात्री कवठेमहांकाळजवळ कुची येथे ही दुर्घटना घडली असून अपघातग्रस्त म्हैसाळ (ता. मिरज) येथील आहेत. अपघातात रेखा त्रिपाठी कांबळे (वय ४८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर भारती राजू कांबळे (वय २३) या महिलेचा उपचार सुरु असताना रुग्णालयात मृत्यू झाला.
अपघातग्रस्त टेम्पो चालक मोदीनसाब सांबरेकर हे खर्डी (जि. सोलापूर) येथून ११ मजूरांसह द्राक्षे घेऊन बेळगावकडे निघाले होते. कुची गावाजवळ त्यांचे वाहन आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर संबंधित ट्रक समोरील टँकरवर देखील जाऊन आदळला. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोतील महिला राष्ट्रीय महामार्गावर फेकल्या गेल्या. यामध्ये दोघींचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या नऊ जणांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
जखमींमध्ये राणी वडर (४३), कांचन कांबळे (६३) या महिला गंभीर आहेत. तसेच मंगल बेरड (४२), वनिता माने (४०), मंगल आवळे (४०), पार्वती कांबळे (६०), राणी वडर (३८) या महिलासह कबीर कांबळे (३९) व श्रेयस माने (वय ४०) हे अन्य मजूरही जखमी झाले आहेत. जखमींना मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त मजूर म्हैसााळ (ता. मिरज) येथील आहेत. खर्डी (जि. सोलापूर) येथे द्राक्ष बागेत काम करण्यासाठी गेले होते. तेथील द्राक्ष बागेत काम करून ते परतत होते.