ब्युटी पार्लरमध्ये काम करणा-या पत्नीवरच कोयत्याने वार करून जखमी करण्याचा प्रयत्न शनिवारी सायंकाळी सांगलीच्या चांदणी चौकात घडला. सहाय्यक महिलेचा बचाव करण्यासाठी आलेल्या पार्लरच्या मालकीणीवरही हल्ला झाल्याने दोघी महिलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अस्मिता मोहिते ही महिला रंजना कागी यांच्या चांदणी चौकातील पुर्वा ब्युटीपार्लरमध्ये कामास आहे. शनिवारी सायंकाळी अस्मिताचा पती सदाशिव (वय ३१) हा ब्युटी पार्लर नजीक आला. पार्लर समोर असणा-या नारळ विक्रेत्याजवळील कोयता घेऊन त्याने पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी अस्मिताने हात आडवा धरला असता हाताची चार बोटे निकामी होऊन चेह-यावर वार बसला आहे. तिला वाचविण्यासाठी आलेल्या पार्लर मालकीण रंजना कागी यांच्यावरही कोयत्याने त्याने वार केला आहे. दोघींनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर संशयित सदाशिव मोहिते हा कोयत्यासह १०० फुटी रस्त्यावरून चालत निघून गेला. ही माहिती अज्ञातांनी पोलिसांना देताच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात सायंकाळपर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती. दोघीपकी एकीची प्रकृती चितांजनक असल्याचे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा