लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : एका कॉन्व्हेंट इंग्रजी शाळेत शुल्क न भरल्यामुळे एकाच कुटुंबातील चार विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर लिहू दिले नाही. त्याचा जाब विचारला असता पालकासह चारही लहानग्या विद्यार्थ्यांना पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनीही आपले कर्तव्य योग्य पद्धतीने न बजावता चारही विद्यार्थ्यांना सरकारी वाहनात बसवून थेट पोलीस ठाण्यात आणून तासभर थांबवून ठेवले. या घटनेची चौकशी शिक्षण विभागाने हाती घेतली असतानाच नवे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी संबंधित दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

मंजुळा संभाजी वाघमोडे आणि सुनीता किसन धोंडभरे अशी निलंबित झालेल्या दोघा महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त राजकुमार यांनी संबंधित चारही पीडित विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट भेट देत आधार दिला.

आणखी वाचा-सांगली : कृष्णा प्रदुषणाबद्दल महापालिकेला ९० कोटीचा दंड

या घटनेची माहिती अशी की, सात रस्त्याजवळील रेल्वे लाईनमध्ये हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च इंग्रजी शाळेत एकाच कुटुंबातील वैष्णवी सुरेश कोळी, धानेश्वरी सुरेश कोळी (दोघी इयत्ता नववी), आराध्या रमेश कोळी (पाचवी) आदी चार मुला-मुली शिक्षण घेतात. शाळेत द्वितीय सत्र परीक्षा होती. परंतु शुल्क भरूनही शाळा व्यवस्थापनाने संबंधित चारही मुला-मुलींना परीक्षेचा पेपर लिहू दिला नाही. त्याबद्दल जाब विचारला असता शाळा व्यवस्थापनाने वाईट वागणूक दिल्याचा आरोप पालक रमेश कोळी यांनी केला आहे. कोळी यांनी य अन्यायाच्या विरोधात शाळा प्रवेशद्वारासमोर पाल्यांसह ठिय्या मारून धरणे धरले असता शाळेने आपल्यावरील आरोप नाकारत, पोलिसांना पाचारण केले.

दरम्यान, दोघा महिला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी पालकासह चारही लहान पाल्यांना सरकारी वाहनात बसवून सदर बझार पोलीस ठाण्यात नेऊन सुमारे तासभर बसविले. या घटनेमुळे मुले गांगरून गेली.

आणखी वाचा-वरिष्ठांचा युतीबाबतचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटलात? आशिष शेलार म्हणाले, “आम्ही साद घालायला…”

दरम्यान, शाळेच्या विरोधात पालक रमेश कोळी यांनी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली असता दुसरीकडे या प्रकरण पोलिसांच्याही अंगलट आले. चारही अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात आणण्याची गरज नव्हती. त्याऐवजी त्यांना त्यांच्या घरात नेऊन सोडणे अपेक्षित होते. पोलीस आयुक्त राजकुमार यांनी या घटनेची दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्याकडे चौकशी सोपविली. चौकशीत संबंधित दोन महिला पोलीस कर्मचारी दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

दुसरीकडे माध्यमिक शिक्षण विभागानेही उपशिक्षणाधिकाऱ्यामार्फत हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च शाळेची चौकशी सुरू केली असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शाळेने आरोप नाकारले

हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च शाळा विनाअनुदानित असून शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आकारले जाते. संबंधित चारही विद्यार्थ्यांकडून शुल्क थकले असता पालकांना बोलावून शुल्क भरून घेण्यात आले. परंतु परीक्षेचा पेपर लिहू दिला नाही, हा पालकांचा आरोप खोटा आहे. संबंधित विद्यार्थ्यांची कोठेही अडवणूक केली नाही. -ईस्टर विनय, प्राचार्या, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च माध्यमिक शाळा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women policemen suspended for taking students to police station after dispute in convent school mrj