धाराशिव : फटाके निर्मितीसाठी मराठवाड्यात प्रसिध्द असलेल्या वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील एका फटाका कारखान्यात अचानकपणे स्फोट होवून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील संतोष फायर वर्क्स या फटाके निर्मितीच्या कारखान्यात शुक्रवारी अचानकपणे स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्यातील फटाके निर्मितीचे साहित्य, दारू जळून खाक झाले आहे. तसेच या स्फोटामुळे दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक
स्फोट होताच परिसरातील ग्रामस्थांनी लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान या स्फोटामुळे कारखान्यात काम करीत असलेले दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हलविण्यात आले आहे. जखमी असलेल्या दोघांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.
हेही वाचा >>> “डोबिंवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार”; अंबादास दानवेंचा आरोप; फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
दरम्यान या घटनेचा महसूल व पोलीस प्रशासनाने पंचनामा केला असून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महसूल प्रशासनाला घटनेचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान प्रशासनाने फटाका कारखान्यांत दुर्घटना होवू नयेत, यासाठी मार्गदर्शक सूचना घालून दिल्या होत्या. या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार असून उन्हाळ्यात एका खोलीत किती व कोणत्या फटाक्यांचा साठा असावा, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन झाले की, नाही याचा अहवाल जिल्हाधिकार्यांनी मागविला आहे.
दोषीवर कारवाई करणार : जिल्हाधिकारी
तेरखेडा येथे फटाके निर्मितीचे अनेक परवानाधारक कारखाने आहेत. परवाना देताना घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करण्यात आले की नाही, याची चौकशी करून त्याचा तत्काळ अहवाल मागविला आहे. कोणत्या कारखान्याने किती व कोणत्या केमिकल, दारू व अन्य साहित्याचा साठा केला, एका खोलीच्या आकारानुसार झालेली साठवणूक, घेण्यात आलेली खबरदारी आदी बाबी तपासण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.