जिल्हा परिषद शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र तत्पूर्वीच त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय पारवे यांनी घेतला आहे.
भिवापूर तालुक्यातील सेलोटी गावातील जिल्हा परिषद शाळेत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सुधीर पारवे यांनी अचानक भेट दिली. त्या वेळी शिक्षक महेंद्र धारगावे हे चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत होते. या वर्गात जाऊन पारवे यांनी थेट धारगावे यांना थप्पड मारली. २००५ मधील ही घटना होती. त्यांच्यावर विद्यार्थ्यांना नीट शिकवत नसल्याचा, शाळेत वारंवार गैरहजर राहत असल्याचा ठपका पारवे यांनी ठेवला. शुक्रवारी भिवापूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असता आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Story img Loader