लोणावळा : लोणावळा परिसरातील टाटा धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. धरणात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाला सायंकाळी यश आले.
विवेक छेत्री (वय २१), करण कुंवर (वय २०, दोघे रा. ओकाळाईवाडी) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. लोणाववळ्यातील टाटा धरणात छेत्री आणि कुंवर रविवारी दुपारी पोहण्यासाठी उतरले. दुपारी दोनच्या सुमारास दोघेजण बुडाल्याची माहिती त्यांचा मित्र परेश भूल (वय १८, रा. ओकाळाईवाडी) याने पोलिसांना दिली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती शिवदुर्ग मित्र रेस्क्यू संस्थेचे सदस्य अजय शेलार, महेश म्हसणे, सागर कुंभार, मनोहर ढाकळ, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले आदींनी शोधमोहीम राबविली. सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेहांचा शोध घेण्यात पथकाला यश आले.