वाई:साताऱ्यातील कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून दरीत कोसळून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून दोन तरुण खोल दरीत कोसळले. या घटनेत दोन्ही युवकांचाही मृत्यू झाला आहे.धबधब्या जवळून सायकाळी सहाच्या सुमारास दोघेजण कड्यावरून पाय घसरून दरीत कोसळले होते.एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी मित्रांसह हे युवक आले होते. मद्य पिऊन त्यांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. भांडणामधेच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला भांडण करत गेले असता दोघेजण खोल दरीत कोसळले.
हेही वाचा >>> सातारा:माझ्या बहिणीची छेड काढू नकोस अस सांगणाऱ्या भावाचा मारहाणीत मृत्यू
रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस,दाट धुके व अवघड जागा यामुळे घटनास्थळी पोहचण्यास वेळ लागत आहे. मेढा पोलीस,स्थानिक ग्रामस्थ आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत.अंधार आणि पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या.दरीत पडलेले युवक बसाप्पाचीवाडी व करंजे(ता सातारा) येथील असल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशिरा या दोघा युवकांपर्यंत पोहोचण्यास रेस्क्यू टीमला यश आले आहे. त्यांना दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले असून ते वर काढण्याचे काम सुरू होते. अंधार आणि पावसामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत.अक्षय आंबवले व गणेश फडतरे अशी त्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर हे मदत पथकासह घटनास्थळी आहेत. आज रविवार असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक जमा झाले होते. अनेक युवक या परिसरात हुल्लडबाजी करतात. त्यातूनच ही दुर्घटना घडली आहे .शनिवार रविवारी सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.