रत्नागिरी : समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय खलाशांसह रत्नागिरीतील दोन तरुणांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण केले होते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश असून, त्यांच्या सुटकेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमव्ही बिटू रिव्हर’ नावाचे डांबर वाहतूक करणारे जहाज कॅमेरूनमधील डुआला बंदराकडे निघाले होते. पश्चिम आफ्रिकेच्या सागरी हद्दीत पोहोचल्यावर समुद्री चाच्यांनी जहाजावर हल्ला चढवून ते ताब्यात घेतले. यात जहाजावरील सात भारतीय खलाशांचे चाच्यांनी अपहरण केले होते. यामध्ये रत्नागिरी शहरातील भाटकरवाडा येथील समीन जावेद मिरकर आणि कर्ला येथील रेहान शब्बीर सोलकर या दोन तरुणांचा समावेश होता. इतर खलाशी तामिळनाडू आणि केरळ येथील होते.
गेला महिनाभर हे सर्वजण समुद्री चाच्यांच्या कैदेत होते. या घटनेने रत्नागिरीतील मिरकर आणि सोलकर कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले होते. या अपहरणाच्या घटनेची केंन सरकारच्या परराष्ट्र विभागाने गंभीर दखल घेतली होती. तसेच या तरुणांच्या सुटकेसाठी कु उद्योगमंत्री उदय सामंत व मत्स्योद्योगमंत्री नीतेश राणे यांचेशी त्या दोघांच्या कुटुंबीयांनी सुटकेबाबत निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचबरोबर कॅप्टन फैरोज मुकादम, मुनीर कर्लेकर, मोहम्मद सहर कर्लेकर यांनीही त्यांच्या पालकांना मदत केली.
सर्व सात भारतीय खलाशांची समुद्री चाच्यांच्या तावडीतून शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सुटका करण्यात आली. सुटकेनंतर समीन मिरकर आणि रेहान सोलकर यांच्या कुटुंबीयांनी आणि रत्नागिरीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. सुटका झालेले समीन आणि रेहान हे दोन्ही तरुण शनिवारी, १२ एप्रिल रोजी आफ्रिकेतून भारताकडे परतण्यासाठी निघाले असून, ते लवकरच आपल्या घरी रत्नागिरीत परततील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.